शाळेबद्दल

renavikar-prashala-prathamik-school-banner

शाखेचा इतिहास: स्थापना व पूर्वपिठीका

अहमदनगर  शहरातील हडको भागात ९ जून १९८७ रोजी साधना शिक्षण संस्थेची स्थापना झाली.बालवाडीचे दोन वर्ग आणि १ ते ४ असे चार वर्ग करण्याचा मानस संस्थाचालक रेणावीकारांचा असल्याने सावेडी परिसरातील ‘झुंद’ या छोटेखानी बंगल्यात वर्ग सुरु करण्यात आले. १९८७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मुळे यांनी काम पहिले.

१९८८ मध्ये या शाळेचे नाव रेणावीकर शिक्षण संस्थेचे कै.दा.शं.रेणावीकर विद्या मंदिर असे नामांतर होऊन ‘ज्ञान हेच सामर्थ्य’ हे ब्रीदवाक्य घेउन सौ. खेले बाई यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरु झाली.शाळेला स्वत:ची इमारत नव्हती झुंद बंगल्यात १ ते ४ थी वर्ग आणि त्याच भागातील बर्वे बंगल्यात ५ वी, ६ वी असे वर्ग भरत होते.

प्रगतीचे टप्पे

विस्तार नवीन वर्ग ,अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या:
मा. रेणावीकरांनी १९८७ मध्ये १० विदयार्थी संख्या असलेली शाळा सुरु करून विस्तृत असं ज्ञानशिल्पच उभ केलेलं आहे म्हणाव लागेल

विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी वैदुवाडी परिसरात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात शिक्षणसंस्थेचे पदाधिकारी, शिक्षक मुख्याध्यापक सर्वांचाच मोठा वाटा होता. विद्यार्थी संख्येत जसजशी वाढ होऊ लागली तसे ऐकेक वर्गही वाढू लागले.

१९८८ मध्ये ५ वी चा वर्ग सुरु करण्यात आला वर्ग आणि विदयार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्येत वाढ होऊ लागली.

वैदुवाडीचा परिसर असल्याने  त्यांना  लेखन कौशल्य आणि विचार करण्याची फारशी क्षमता नव्हती. विद्यार्थीची प्रगती साधण्यासाठी  जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारे शिक्षक होते म्हणून हे साध्य होऊ शकले.

१९८९ मध्ये मुख्याध्यापिका सौ बुलाख बाई यांची नियुक्ती करण्यात आली.
शाळेमध्ये स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध असे वर्ग सुरु करण्यात आले.

१९९१ ला ८ वी चा वर्ग सुरु करण्यात आला. विदयार्थी सगळेच बाहेरचे होते. त्यांना लेखन वाचन कौशल्य,अक्षर ओळख यांचे ज्ञान नव्हते  अशावेळी शिक्षकांनी सकाळी ३-३ तास त्यांच्याकरता शाळेत येऊन घडवून आणलेला बदल, प्रगती अपरिमित होती ७ वी पर्यंत विद्यार्थी विविध स्पर्धा परिक्षेत भाग घेऊ लागले.

दहावीच्या वर्गावर सुरवातीच्या काळात खूप कष्ट घेतले जात. सकाळचे तास, दिवस भराची शाळा आणि रात्रशाळा त्यामुळे बोर्डाचा निकाल उत्तम लागून विदयार्थी बोर्डातही  येत असत. १९९६-९७ मध्ये शाळेला १००% अनुदानही मिळाले

बदलत्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना प्रशिक्षणाला पाठवले जात. शिक्षक अनुभवी असून तळमळीने अध्यापन करतात.

भौतिक विकास जागा इमारत बांधणी स्थलांतर नूतनीकरण वाढ व नामांतर:
रेणावीकर शाळेच्या स्थापनेनंतर शाळेस इमारत नव्हती. शाळा खूप मोठी व्हावी आणि शाळेचे लौकिक सर्वत्र पसरावा या हेतूने, ध्येयाने रेणावीकर बंधूनी

त्यांच्या जागेत सावेडी परिसरात १९९० ९१ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरु केले लवकरच वेगवेगळ्या बंगल्यात  भरणारी शाळा नव्या इमारतीत आली.

झुंज बंगल्यातील जुन्या शाळेत विद्यार्थ्याना बसायला बेंच नव्हते शिक्षकांना खुर्च्याही नव्हत्या मुख्याध्यापकांच ऑफिस खालच्या वर्गात पार्टीशन टाकून तिथे केले होते तिथे एक टेबल आणि २-३ खुर्च्या अशी व्यवस्था होती.

१९९१ मध्ये शाळा नव्या जागेत आल्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय शिक्षक खोली विद्यार्थांसाठी इतर सुविधा उपलब्ध झाल्या.
वर्गातील बेंचेस, वीज, पिण्याच्या पाण्याची सोय या सारख्या सुविधा हळू हळू एकेक वर्षी उपलबध्य झाल्या.

खेळासाठी मोठे मैदान उपलब्ध असल्याने. त्या मैदानावर विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन केले जात असे.

शाळेची वाढती प्रगती, स्कॉलरशिप आणि बोर्डच्या परीक्षेत येणारे विद्यार्थी यामुळे शाळा प्रगतीपथाकडे जाण्याचा अलौकिक आनंद संस्थाचालक आणि संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सर्वांनाच झाला.

शाळेच्या गुणवत्तेत झालेली वाढ, क्रीडास्पर्धा, नाटयवाचन स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, योगासाने व प्राणायाम वर्ग यामुळे शाळेचा लौकिक संपूर्ण नगर शहरात वाढला. सन १९९९ मध्ये सौ.अलका जोशी यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्विकारला.

शाळेची प्रगतीपथाकडे घोडदौड सुरु असताना २००४ च्या नोव्हेंबर मध्ये शालेय इतिहासात एक स्थित्यंतर घडले. पुण्यातील ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कड़े शाळा हस्तांतरित झाली. व सन २००५ मध्ये शाळेची दुसरी इमारत उभी राहिली यामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष, वाचनालय, सुसज्ज प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

सन २०१६ मध्ये शालेय इमारतीचे नूतनीकरण व कै,दामोदर माधव तथा दामू अण्णा दाते हे भव्य सभागृह बांधण्यात आले. या समारंभासाठी मा. श्री.दादा इदाते (अध्यक्ष, राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोग, भारत सरकार नवी दिल्ली) व आदर्श ऋषीजी महराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

शालेय सुविधा ह्या आपल्या आहेत म्हणून कितीही मुबलकता असली तरी या गोष्टींचा वापर योग्य व्हायला हवा याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे आवश्यक आहे.


संघर्षाचा कालखंड / त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न केलेल्ये उपाययोजना संस्था – बाह्य व्यक्ती किवा संस्थांची मदत झाली असल्याची त्याची माहिती

विद्यालयाची सुरुवात जून १९८७ रोजी झाली. सुरुवातीचा कालखंड हा संघर्षचा असतोच परंतु पूर्व संस्थापक हे अहमदनगर मधील नामवंत बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांनी स्वत:च शाळा मोठी होण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले .

अनुदानित प्राथ. विभागातील शिक्षक ब शिक्षकेतर कर्मचारी यांनी साधारण पणे ४ ते ५ वर्ष आपल्या पगारातील ५०% पेक्षा जास्त हिस्सा शालेय प्रगतीसाठी देऊ केला.

अन्यसंस्था ( स्थानिक ) जसे सेंट विवेकानंद शिक्षण संस्था ना. ज. पाऊलबुधे शिक्षणसंस्था याची मदत शाळा मान्यता, अनुदान, शिक्षक मान्यता कोर्ट केसेस या बाबत थोडयाफार प्रमाणात झाली. संघर्ष हा चालूच असतो परंतु रडत न बसता त्यावर मात करीत शाळेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली.

विशेष उल्लेखनीय घटना

  • शे सन २००४ मध्ये रेणावीकर शिक्षण संस्था हि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यांचे हस्तांतरित करण्यात आली व विद्यालयाचे नाव म.ए.सो. कै.दा.शं. रेणावीकर विद्या मंदिर असे करण्यात आले.
  • म.ए.सो ला १५० वर्ष पूर्ण झाल्याने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त ‘अमर आग’ नावाचा संगीत मैफिलीचा कार्यक्रम मे २०१० मध्ये संपन्न झाला ज्याच्या माध्यमातून जवळपास २ ते २.५ लाख रुपये निधी म.ए.सो साठी अर्पण करण्यात आला.
  • म.ए. सो रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या इमारत विस्तारीत बांधकाचा शुभारंभ एप्रिल २०१६ मध्ये झाला तर पूर्णत्वास ३१ मार्च २०१७ ला झाले यातील सभागृहास जेष्ठ संघ कार्यकर्ते मा. श्री. दामोदर माधव तथा दामूअण्णा दाते सभागृह असे नामकरण करण्यात आले.

नामवंतांच्या भेटी

२५ वर्षाच्या कालखंडात स्नेहसंमेलन निमित्त प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या खालील न नामवंतां च्या  भेटी  विद्यालयास झाल्या

स्नेह संमेलन  प्रमुख अतिथी:

१) मा. श्री. द.मा. मिराजदार (जेष्ठ साहित्यिक)
२) मा. श्री. दत्ता टोळ (जेष्ठ साहित्यिक)
३) मा. श्री. श्रीनिवास भणगे (पटकथाकार)
४) मा. श्री. बंन्डा जोशी (आकाशवाणी कलाकार)
५) मा. श्री. संजय उपाध्ये (गप्पाटप्पाकार)
६) मा. श्री. मुकुंद घैसास (ज्येष्ठ अर्थतज्ञ)
७) मा. श्री उदय वारुंजीकर (ज्येष्ठ विधिज्ञ)
८) मा. सौ घारपुरे माधवी (श्वास च्या लेखिका)
९) मा. सौ वैद्य माधवी (म.ए.सो. पुणे, अध्यक्षा)
१०) मा. डॉ. न.म. जोशी (ज्येष्ठ साहित्यिक)
११) मा. श्री. जयराम कुलकर्णी (सिने अभिनेते)
१२) मा. श्री. सलिल कुलकर्णी (सुप्रसिद्ध गायक,संगीतकार)
१३) मा. श्री. संदिप खरे (सुप्रसिद्ध कवी, गायक)
१४) मा. श्री. बाळ ज. बोठे (संपादक सकाळ वृत्तपत्र)
१५) मा. श्री. लहू कानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व साहित्यिक)
१६) मा. श्री. शशिकांत शिंदे (प्राध्यापक व कवी)
१७) मा. श्री. ना. स. फरांदे (शिक्षक आमदार)
१८) संजीवनी रायकर (शिक्षक आमदार)
१९) मा. श्री. सुधाकर गरसोळे / सीना गरसोळे (भूगोल तज्ञ)
२०) मा. श्री.दादा इदाते (रा.वि.भ जाती / जमाती भारतीय आयोग अध्यक्ष)
२१) श्री. व सौ. कांकरिया (सुप्रसिद्ध डॉक्टर)
२२)  मा.श्री. पोपटराव पवार (सरपंच हिवरे बाजार, अध्यक्ष आदर्श गाव समिती)
२३) चिंटूचे निर्माते श्री. चारुहास पंडित व श्री. प्रभाकर वाडेकर
२४) श्री. च. वि. जोशी (प्राध्यापक व साहित्यिक)

वेळो वेळी शालेय तपासणीसाठी विविध अधिकारी जसे

  • शिक्षण उपसंचालक
  • शिक्षणाधिकारी
  • शिक्षण विस्तार अधिकारी
  • गटशिक्षण अधिकारी ( पंचायत समिती
  • जिल्हाचे आमदार / खासदार / महापौर
  • प्रशासनाधिकारी

नामवंतांच्या भेटीमुळे दुहेरी परिणाम होतात त्यांचे विचार विद्यार्थ्यांना आदर्श वाटतात व समाज परिवर्तनाचे काम सुकर होते.