नमस्कार,
अहिल्यानगर शहरातील गुणवत्ता व दर्जा असणारी आपली शाळा आहे. भव्य मैदान, प्रशस्त इमारत व अटल टिंकरिंग लॅब ही शाळेची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांना आलेले अनुभव, अनुकरण, त्यातूनच समोर येणाऱ्या त्यांच्या बाललीला, तसेच पालकवर्गाचे सहकार्य, शाळेच्या अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन शाळेला लाभले. त्यामुळे या वर्षात विविध उपक्रम राबवले. निर्माल्यापासून खतनिर्मिती, पर्यावरणपूरक प्लास्टिक ब्रिक्सचे बेंचेस बनविणे, हलव्याचे दागिने, स्वच्छता साधनांचे प्रदर्शन, कारागिरी उपक्रमांतर्गत जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन यासारखे उपक्रम शाळेत घेण्यात आले.
शैक्षणिक उपक्रमांमध्ये शैक्षणिक साहित्यनिर्मिती, वारली चित्रांचे प्रदर्शन, विविध व्यावसायिकांच्या मुलाखती, भारत देशाच्या विविधतेवर आधारीत प्रकल्प सादरीकरण, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, चौरस आहारांतर्गत सॅलड डेकोरेशन व पौष्टिक लाडू बनविणे, विज्ञान दिन व मराठी गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम इ. गोष्टी उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
म.ए.सो. करंडक स्पर्धा यात आपल्या शाळेने यश मिळविले आहे. शाळेतील विद्यार्थी क्रीडास्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व, श्लोक पाठांतर, गायन स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा इत्यादीमध्ये सहभागी होतात व यश प्राप्त करतात.
शाळेच्या यशामध्ये नेहमी प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे शाला समिती अध्यक्ष मा.डॉ.श्री.राजीव हजिरनीस, महामात्र मा.श्री. रविकांत झिरमिटे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचा मोलाचा वाटा आहे.
सौ. ललिता दिगंबर कारंडे
पद: मुख्याध्यापिका
शैक्षणिक अर्हता: D.Ed., B.A.
सेवाकाल: ३२ वर्षे